केस क्र ३. - क्रेडिट कार्ड शाप की वरदान




केस क्र . - क्रेडिट कार्ड शाप की वरदान

१५.०३.२०२५

वरील शीर्षकाचे अवलोकन करताना, तुमच्या लक्षात येईल की, चर्चा एका अशा व्यसना बद्दल होत आहे जे सहजपणे बाजारात उपलब्ध आहे, तसेच याची जाहिरात देखील आपणाला टीव्हीवर पाहायला मिळते. दिवसातून येणाऱ्या फोन पैकी किमान एक ते दोन फोन हे या क्रेडिट कार्ड विक्रीचेच असतात, याचा सारासार अनुभव आपल्याला आला असेलच!

क्रेडिट कार्डचा शोध सन १९०० च्या दरम्यान पाश्चिमात्य देशात लागला. १९२० च्या दशकात अमेरिकेत किरकोळ विक्रेत्यांनी खरेदीसाठी क्रेडिट टोकन देण्यास सुरुवात केली. १९५० साली "डायनर्स क्लब"ने पहिले आधुनिक क्रेडिट कार्ड सादर केले, ज्यामुळे लोकांना विविध ठिकाणी रोख रकमेशिवाय व्यवहार करता येऊ लागले. आणि १९५८ मध्ये बँक ऑफ अमेरिकाने यशस्वी रित्या आर्थिक बाजारपेठेत उपलब्ध केले, त्यानंतर हळू हळू त्याचा वापर सर्व जग पसरला. १९६० च्या दशकात बँकांनी हे तंत्रज्ञान स्वीकारले आणि "व्हिसा" व "मास्टरकार्ड" सारख्या ग्लोबल ब्रँड्सची स्थापना झाली. भारतामध्ये सन १९८० मध्ये क्रेडिट कार्ड वापरची सुरवात झाली. क्रेडिट कार्डला “प्लॅस्टिक कार्ड” किंवा “प्लॅस्टिक मनी” सुद्धा म्हणतात. क्रेडिट कार्डची निर्मिती ही लोकांची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी झाली होती आणि सुरवातीच्या काळात क्रेडिट कार्डचा यथायोग्य वापर देखील करण्यात आला. एकंदरीत पाहता क्रेडिटकार्ड हे एक प्रकारचे वरदानच आहे असे लोकांना वाटू लागले व तसे स्वाभाविक सुद्धा होते. क्रेडिट कार्डचा वापर जगभर वाढू लागल्यामुळे विविध कंपन्या नव-नवीन स्कीम घेऊन बाजारात येऊ लागल्या आणि स्वस्त व सहज क्रेडिट कार्ड ग्राहकांना उपलब्ध झाले. क्रेडिट कार्ड मधील क्रेडिट लिमिट जेवढे आहे, तेवढीच रक्कम क्रेडिट कार्ड मधून वापरता येते. क्रेडिट कार्डचे क्रेडिट लिमिट हे ग्राहकांच्या उत्पन्नानुसार, त्यांच्या क्रेडिट स्कोरनुसार व कर्जाची परतफेड करण्याबाबतचा मागील वर्षांचा अहवाल यानुसार वेगवेगळे असते. सुरवातीला उधारीवर मिळणे रु १०,०००/- ग्राहकांच्या वापरानुसार वाढत जातात व रु १,००,०००/- ते रु. १०,००,०००/- उधारीवर( क्रेडिट कार्डवर) मिळू लागले. क्रेडिट कार्डचा वापर करून ग्राहकांनी काही खरेदी केली असल्यास त्यावर विविध प्रकारचे discount, rewards, cashback मिळतात. ग्राहक आपल्या सोईनुसार क्रेडिट कार्डचा वापर करून नमूद वेळेत म्हणजेच ४५ दिवसात करत असे. त्यामुळे लोकांना आर्थिक मदतीसाठी कोणापुढे हात पसरावे लागत नाहीत. ग्राहकांनी वापरलेली रक्कम ही बिनव्याजी ४५ दिवसांनी परत करता येते. जर ४५ दिवसांमध्ये क्रेडिट कार्ड मधून वापर केलेली रक्कम पूर्ण भरता येत नसेल तर किमान रक्कम ( minimum due) भरण्याची सुद्धा मुभा उपलब्ध आहे. जेणेकरून एखाद्या महिन्यात पूर्ण रक्कम न भरू शकलेला ग्राहक सदर रक्कम पुढील महिन्यात लागू असणाऱ्या व्याजासहित भरता येते. प्रत्येक  क्रेडिट कार्डला एक वार्षिक फी आकारली जाते, विविध कंपण्याची वार्षिक फी ही वेगवेगळी असते. काही क्रेडिट कार्ड मध्ये विशिष्ट रकमेच्या खरेदी केल्यानंतर वार्षिक फी रद्द देखील करण्यात येते. क्रेडिट कार्डची रक्कम विशिष्ट कालावधीच्या (म्हणजेच ४५ दिवसामध्ये) आत न भरल्यास १८% पासून ते ४२% एवढ्या व्याज दराने रकमेची परत फेड करावी लागते. प्रत्येक कंपनीचा व बँकेचा व्याज दर हा वेगवेगळा असतो. त्याच प्रमाणे विलंब शुल्क (late fee) देखील भरावी लागते. क्रेडिट कार्डचा वापर केल्यानंतर किमान रक्कम ( minimum due) किंवा संपूर्ण रक्कम वेळेवर न भरल्यास तुमचा cibil score कमी होतो, ज्यामुळे भविष्यात कर्ज घेण्याकरिता अडचण निर्माण होऊ शकते. क्रेडिट कार्डमधील उपलब्ध असणारे क्रेडिट लिमिटच्या ३५% रक्कम आपण दर महिन्याला वापरल्यास आपला cibil score चांगला राहतो, पण दुर्दैव असे आहे की क्रेडिट कार्ड वापर करणाऱ्यांपैकी ९०% ग्राहकांना हे माहीत नसते. तुमचे जेवढे उत्पन्न आहे त्याच्या ५०% एवढेच क्रेडिट लिमिट असणारे क्रेडिट कार्ड तुमच्या कडे हवे आणि जोपर्यंत तुम्ही त्या ५०% रकमेची परतफेड करत नाही तो पर्यंत वाढीव रक्कम वापरू नये.(उदा. तुमचे मासिक उत्पन्न रु ५०,०००/- असल्यास तुम्ही क्रेडिट कार्ड मधून प्रती माह रु २५,०००/- पेक्षा जास्त रक्कम वापरणे जोखमीचे आहे.)

क्रेडिट कार्डच्या क्रेडिट लिमिट मध्ये मिळणारी रक्कम ही तुमच्या महिन्याच्या उत्पन्नात झालेली वाढ नसते. तर ते तुम्ही घेतलेले एक प्रकारचे कर्ज आहे, जे तुम्ही योग्य वेळेत भरले तर बिनव्याजी, नाही तर व्याजासहित भरावे लागते. परंतु बरेच ग्राहक येथेच गल्लत करतात. सहज उपलब्ध होणारे क्रेडिट कार्ड आणि त्यासोबत मिळणारे क्रेडिट लिमिट काही लोकांच्या मनात लालसा निर्माण करते व असे लोक विविध बँकेचे किंवा कंपनीचे एक पेक्षा अधिक क्रेडिट कार्ड विकत घेतात आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात सुरू होतो “game of Loan”. क्रेडिट कार्डचा वापर कसा केला जातो यावरच हे वरदान ठरते की शाप, याचा निर्णय अवलंबून असतो. या लेखामध्ये आपण क्रेडिट कार्डच्या इतिहासापासून त्याचे फायदे, तोटे, योग्य वापराचे मार्गदर्शन आणि अतिवापराच्या दुष्परिणामांपर्यंत सर्व पैलूंवर चर्चा करू.

     राजेश (काल्पनिक नाव), एक मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारा विवाहित तरुण, दोन गोड मुलींचा पिता होता. त्याचा मोठी मुलगी सहा वर्षांची  आणि धाकटी फक्त दोन वर्षांची होता. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी राजेश एका खाजगी कंपनीत नोकरी करत असे. मात्र, त्याचा मासिक पगार फक्त ८५,००० होता, जो कुटुंबाच्या खर्चासाठी पुरेसा नव्हता. 

सुरुवातीला त्याने त्याचा पगार जपून खर्च केला. पण मुलींचे शिक्षण, कुटुंबाचा रोजचा खर्च आणि भविष्यासाठी बचत करण्याचा ताण यामुळे त्याला अडचणी येऊ लागल्या. गरजा भागवण्यासाठी त्याने पहिल्यांदा एक क्रेडिट कार्ड घेतले. त्याचा वापरही योग्य प्रकारे केला. प्रत्येक महिन्याला तो वेळेत बिल भरत असे. पण जीवन नेहमीच नियोजनानुसार चालत नाही. 

अडचणींचा आरंभ 

एका दिवसात आयुष्य बदलू शकतं, हे राजेशला कळलं, जेव्हा त्याच्या पत्नीच्या तब्येतीमध्ये अचानक बिघाड झाला. मोठ्या वैद्यकीय खर्चामुळे त्याला आणखी एक क्रेडिट कार्ड घ्यावं लागलं. उपचारांसाठी त्याने क्रेडिट कार्डचा योग्य वापर केला, पण त्याचसोबत कुटुंबाच्या गरजाही वाढल्या. पत्नी आणि मुलांच्या चांगल्या जीवनशैलीसाठी, मुलांच्या शाळेचे वाढते शुल्क, आणि घरगुती खर्च वाढल्याने त्याला आणखी तीन-चार क्रेडिट कार्ड्स आणि काही वैयक्तिक कर्ज घ्यावे लागले. 

कर्जाचा सापळा 

शुरुवातीला सगळं सुरळीत चाललं. तो प्रत्येक कर्जाची हप्ता वेळेत भरत असे. पण क्रेडिट कार्डवरील उच्च व्याजदर आणि कर्जाच्या वाढत्या हप्त्यांमुळे त्याला महिन्याच्या पगारापेक्षा जास्त रक्कम भरणं भाग पडू लागलं. दर महिन्याला त्याला ,८०,००० इतकी रक्कम फक्त कर्ज आणि क्रेडिट कार्ड हप्त्यासाठी लागे. पण त्याचा पगार फक्त ८५,००० असल्यामुळे त्याला उर्वरित रक्कम वेगवेगळ्या ठिकाणांहून उधार घ्यावी लागे. 

संकटाचा शिखरबिंदू 

कर्ज फेडण्यासाठी लागणाऱ्या पैशाचा ताण वाढत गेला. त्याने काही महिने हप्ते चुकवले. त्यामुळे बँका आणि फायनान्स कंपन्यांचे वसुली एजंट त्याला सतत त्रास देऊ लागले. हे मानसिक ताण प्रचंड वाढले. दुसरीकडे, व्याजामुळे कर्जाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेले.

एका रात्री, निराशेच्या भरात राजेशने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण त्याच्या कुटुंबाने वेळेत त्याला वाचवलं. त्याच्या पत्नीने आणि नातेवाईकांनी त्याला आधार दिला. त्यांनी त्याला मानसिक आणि भावनिक आधार देऊन पुन्हा उभं राहण्यासाठी प्रेरित केलं. 

कायदेशीर मदतीचा आधार 

राजेश जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा बऱ्याच निराश आणि हतबल झाला होता. त्याच्याशी प्राथमिक चर्चा केल्यानंतर मला कळले की, त्याने बऱ्याच प्रमाणात क्रेडिट कार्ड चा उपयोग केला आहे आणि कमीतकमी रक्कम भरून त्याचे व्याज वाढले होते त्यामुळे दरमाह त्याची रक्कम वाढत होती. त्यांनंतर मी आणि राजेश  सर्व फायनान्स कंपन्या, बँका आणि क्रेडिट कार्ड प्रदात्यांना पत्र लिहून व्याज कमी करण्याची, दंड माफ करण्याची, आणि कर्जाच्या सेटलमेंटची विनंती केली. बराच वेळ लागला, पण शेवटी फायनान्स कंपन्या काही प्रमाणात व्याज माफ करण्यास तयार झाल्या.

राजेशने आपल्या नातेवाईकांकडून व्याजाविना पैसे उधार घेतले आणि काही कर्जाचा मोठा भाग फेडला. आणि योग्य आर्थिक नियोजन करून भरमसाठ मोठा असलेला हप्ता कमीतकमी करून त्याच्या पगारामध्ये कसा बसेल याचे नियोजन केले.  

जीवनशैलीतील बदल 

या संकटातून सावरताना राजेशने महत्त्वाचा धडा घेतला. त्याने आपल्या जीवनशैलीत मोठे बदल केले. आधी जिथे तो चैनीच्या गोष्टींवर पैसे खर्च करत असे, तिथे त्याने गरजेपुरता खर्च करायला सुरुवात केली. पत्नी आणि मुलांनाही त्यांनी समजावलं, की सध्या फक्त गरजेच्या गोष्टींवरच भर द्यायचा आहे. 

आजची स्थिती

आज राजेशने आपलं आयुष्य पूर्वपदावर आणलं आहे. त्याने कर्जाचा मोठा भाग फेडला आहे, आणि उर्वरित कर्ज वेळेवर फेडण्याचा निर्धार केला आहे. कुटुंबाचे आर्थिक नियोजन व्यवस्थित केल्यामुळे आता त्यांच्या जीवनात स्थैर्य आहे.

ही केस आपल्याला शिकवते की, आर्थिक नियोजनाच्या अभावामुळे समस्या उद्भवू शकतात, पण योग्य सल्ला, मेहनत, आणि शिस्तबद्ध जीवनशैलीने प्रत्येक संकटावर मात करता येते.

क्रेडिट कार्ड हे वरदान ठरते की शाप, हे पूर्णपणे त्याच्या वापरावर अवलंबून आहे. शिस्तबद्ध वापर आणि नियोजन केल्यास क्रेडिट कार्ड अनेक फायदे देते. मात्र, हलगर्जीपणा, अति खर्च, आणि वेळेवर परतफेड न केल्यास ते शाप ठरू शकते. 

क्रेडिट कार्डचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी आर्थिक शिस्त, सायबर सुरक्षा, आणि वेळेवर परतफेड या गोष्टींचे पालन करणे महत्त्वाचे आहे. योग्य वापराने क्रेडिट कार्ड आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते, तर अयोग्य वापराने ते आर्थिक आणि मानसिक संकटाला आमंत्रण देते.

तरी, याचा उपयोग करण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे नीट समजून घेतले पाहिजेत, जेणेकरून हे आर्थिक साधन खरोखरच "वरदान" ठरावे.

क्रेडिट कार्ड योग्य प्रकारे कसे वापरावे? 

1.    वेळेवर देयके भरा : बिल उशिरा भरल्यास व्याज आणि दंड लागतो. त्यामुळे वेळेवर पूर्ण बिल भरणे महत्त्वाचे आहे. बिल भरच्या तारखेची नोंद डायरी किंवा मोबईल मध्ये करून ठेवा जेणेकरून बिल भरण्याची तारिख चुकणार नाही. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डचे बिल आल्या नंतर लगेच देयक रक्कम जमा करायला सुरवात करावी, शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहू नये. असे केल्याने तुमच्या लक्षात राहील की क्रेडिटचे बिल किती आहे त्याप्रमाणे तुम्ही खर्च कराल.

2.    मर्यादित खर्च करा: फक्त गरजेपुरताच खर्च करावा आणि क्रेडिट कार्डची मर्यादा ओलांडू नये. क्रेडिट कार्ड चे जेवढे लिमिट आहे त्याच्या ३५% रक्कम फक्त वापरावी जेणेकरून तुमचे सीबील स्कोर (Cibil Score) चांगला राहतो. त्याचप्रमाणे तुमचा पगार जेवढा आहे त्याच्या ५०% रक्कमचं क्रेडिट कार्डद्वारे खर्च करावी अन्यथा भरताना अडचणी येण्याची शक्यता टाळता येत नाही.

3.    फक्त विश्वसनीय प्लॅटफॉर्मवर व्यवहार करा: सायबर फसवणूक टाळण्यासाठी फक्त सुरक्षित आणि विश्वसनीय वेबसाइट्सवर व्यवहार करा. चुकून एखादी सायबर फसवणूक बाबत दुर्घटना घडलीच तर लगेच जवळच्या पोलिस ठाणे मध्ये संपर्क साधावा किंवा https://cybercrime.gov.in/ या संकेत स्थळावर तक्रार नोंदवावी. जेणेकरून त्वरित कायदेशीर तक्रार केल्यामुले फसवणूक करून गेलेली रक्कम परत मिळवण्याची शक्यता दाट असते.

4.    रिवॉर्ड्सचा फायदा घ्या : रिवॉर्ड्स आणि सवलतींचा शहाणपणाने वापर केल्यास आर्थिक फायदा होतो.

5.    बजेट तयार करा : मासिक बजेट तयार करून त्यानुसारच क्रेडिट कार्डचा वापर करावा. जेणेकरून तुमच्यावर आर्थिक दडपण येणार नाही तसेच जास्तीचे व्याज दर किंवा दंड भरावा लागणार नाही.

ओव्हरयुटिलायझेशनचे दुष्परिणाम 

1.    आर्थिक संकट: जास्त खर्च केल्यास परतफेड करणे कठीण होते, ज्यामुळे आर्थिक संकट उद्भवते.

2.    व्याजाचा भार: केवळ किमान रक्कम भरल्यास उर्वरित रकमेवर व्याज लागत राहते, ज्यामुळे कर्जाचे ओझं वाढते.

3.    मानसिक ताण : आर्थिक भारामुळे अनेकजण मानसिक ताण-तणावाला सामोरे जातात.

4.    आत्महत्या धोका : काही प्रकरणांमध्ये लोक आर्थिक भारामुळे आत्महत्येचा विचार करतात, ज्यामुळे सामाजिक समस्या निर्माण होतात.

 

धन्यवाद!

 

अधिक माहितीसाठी

अ‍ॅड. विशाल गाडे

आयकॉनिक लिगल सर्व्हिसेस

मो. क्र. ९९८७११२०५६.

Comments

Popular posts from this blog

पतीच्या मृत्यूनंतर पत्नीच्या नावे मालमत्तेचे अधिकार, भाग प्रमाणपत्र (Share Certificate) हस्तांतर आणि त्याचा कायदेशीर परिणाम.

Comparison between a Letter of Administration, Succession Certificate, and Legal Heirship Certificate

जेव्हा सोसायटी कमिटी नियम मोडते: तेव्हा तुमचे कायदेशीर हक्क काय आहेत?