केस स्टोरी नं: १/२०२५ मंद दृष्टी (Slow Vision)
बऱ्याच दिवसापासून विचार करत होतो की, वकील म्हणून कार्यरत असताना रोजच्या जीवनातील अनुभव, खटले यांच्याबाबत काही लिहावं, जेणेकरून चालू असलेले खटले, संपलेले खटले, छोटे-मोठे वाद-विवाद व त्यावरील काढण्यात आलेला तोडगा लोकांपर्यंत पोहोचेल. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि याच प्रवृत्तीमध्ये लपलेल्या असतात काही विकृती, ज्या जाणते-अजाणतेपणे कायद्याचे उल्लंघन करतात आणि नाहक त्याचा त्रास काही सज्जन लोकांना भोगावा लागतो. त्याचप्रमाणे कशाप्रकारे गोष्टी न्यायप्रविष्ठ न करता सामंजस्याने मिटवणे सोपे व सोयीस्कर असते हे समाज घटकांना कळणे अत्यंत आवश्यक आहे. हा छोटासा प्रयास समाज बांधवांमध्ये कायदेशीर ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आहे.
केसचा प्रारंभ
सन २०१८, मला माझ्या
मैत्रिणीचा फोन आला, तिने औपचारिक विचारपूस करून मला विचारले की फॅमिली मॅटर बघतोस
का?, मी होकारार्थी उत्तर दिल्यानंतर तिने सांगितले तिच्या भावाचा काही प्रॉब्लेम
झाला आहे, तर मी बोललो भावाला घेऊन एकदा
ऑफिसला येऊन भेटा, म्हणजे सविस्तर चर्चा करता येईल. २-३ दिवस नंतर मैत्रीण, तिचा भाऊ, आई आणि वडील सर्व कार्यालयात भेटायला आले.
सहकुटुंब-सहपरिवार आले तेव्हाच कळले की विषय गंभीर आहे. तेव्हा तिच्या भावाने
सांगायला सुरवात केली की, तिचा भाऊ अर्जुन मेहता (काल्पनिक नाव) आणि रिया शर्मा
(काल्पनिक नाव) यांचा विवाह प्रेमविवाह नव्हता, तर अरेंज मॅरेजद्वारे झाला होता. दोन्ही कुटुंब प्रतिष्ठित
आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होती. विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला, आणि सर्व काही सुरळीत
वाटत होतं.
पण लग्न झाल्यानंतर काही
दिवसांतच अर्जुनच्या कुटुंबाला लक्षात आलं की रिया वागताना काहीशी गोंधळलेली असते.
तिला वस्तूंना टाळून चालता येत नाही, ती घरात लहान-मोठ्या अडथळ्यांना धडकते, आणि रात्रीच्या वेळी
विशेषतः वस्तू शोधण्यात तिला त्रास होतो, असे बरेच दिवस चालू होते, परंतु नवीन
घरामध्ये तिला रुळायला थोडा वेळ लागत असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केल.
एका प्रसंगी, ती पायऱ्यांवरून उतरत
असताना रियाला ठेच लागली आणि खाली पडता पडता वाचली. तेव्हा अर्जुनच्या आई-वडिलांना
तिच्या वागण्यात काहीतरी वेगळं वाटलं. त्यांनी तिला विचारलं, पण तिची उत्तरं स्पष्ट
नव्हती.
रिया सतत घरात धडपडत
असल्यामुळे आणि तिच्या अडचणी वाढू लागल्यामुळे, अर्जुनच्या कुटुंबाने तिला डोळ्यांच्या तज्ञ डॉक्टरांकडे
नेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की रियाला बालपणापासून मंद दृष्टी (Slow Vision) आहे आणि कमी प्रकाशात किंवा रात्री तिचे
दृष्टीशक्ती खूपच कमी होते, तसेच सामान्य व्यक्तिला दिसणारी गोष्ट रियाला काही सेकंद
उशिरा दिसत असे. उदा: एखादे भांडे पडले की ते
आपल्याला लगेच दिसते पण रियाला ते काही सेकंद उशिरा दिसायचे.
हा धक्का बसणारा खुलासा
होता. अर्जुनच्या कुटुंबाला समजलं की रिया आणि तिच्या कुटुंबाने ही माहिती मुद्दाम
लपवली आणि विवाह ठरवताना हा गंभीर मुद्दा कधीच सांगितला गेला नाही.
डॉक्टरांकडून अहवाल
आल्यानंतर अर्जुन आणि त्याच्या कुटुंबाने रियाच्या आई-वडिलांना याविषयी विचारले.
त्यावर त्यांनी ही बाब महत्त्वाची नाही आणि यामुळे विवाहावर परिणाम होणार नाही, असे सांगितले. मात्र, अर्जुनच्या कुटुंबाला
वाटले की ही गोष्ट आधीच सांगितली असती, तर त्यांनी हा विवाह स्वीकारलाच नसता. त्यानंतर या बाबत काय
करता येईल असे विचारले असता, मी त्यांना सांगितले की प्रथम हा विषय सामंजस्याने
मिटतो का ते पाहू. म्हणून प्रथम आम्ही रिया आणि तिच्या कुटुंबीयांना नोटिस पाठीवली
आणि ७ दिवसामध्ये भेटण्यासाठी येण्याबाबत
कळविले. त्यावर रियाच्या कुटुंबीयांनी फोन करून लगेचच भेटण्याबाबत कळवले. दोन्ही कुटुंबांनी संयुक्त बैठक आयोजित केली. त्यात
अर्जुनच्या वडिलांनी थेट रियाच्या कुटुंबाला विचारले की, ही गोष्ट का
लपवली गेली?
प्रथम, रियाचे आई-वडील
ही बाब नाकारत होते आणि म्हणत होते की ही समस्या तितकी गंभीर नाही. मात्र, जेव्हा
त्यांच्यासमोर वैद्यकीय अहवाल ठेवण्यात आला आणि डॉक्टरांनी सांगितले की रियाचा हा
त्रास अगदी बालपणापासून आहे, तेव्हा शेवटी रियाच्या वडिलांनी आपली चूक मान्य
केली.
रियाच्या आई-वडिलांनी
कबूल केले की, त्यांना भीती वाटत होती की हा विवाह मोडू शकतो, म्हणून त्यांनी
सत्य लपवले. ही समस्या फारशी मोठी नाही असे त्यांना वाटत होते, म्हणून ते
मुद्दाम बोलले नाहीत. जर त्यांनी ही माहिती उघड केली असती, तर कदाचित इतके
चांगले स्थळ त्यांना मिळाले नसते.
हे ऐकताच अर्जुनच्या
कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी या गोष्टीचा विश्वासघात आणि फसवणूक म्हणून
निषेध केला.
मी सदर बैठकीमध्ये हस्तक्षेप करून रियाच्या कुटुंबियाना सांगितले की खालीलप्रमाणे त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे.
- फसवणूक (Fraud & Misrepresentation) – रियाच्या कुटुंबाने मुद्दाम माहिती लपवून विवाह घडवून आणला.
- वैवाहिक विश्वासाचा भंग – विवाह ही विश्वासावर आधारलेली संस्था आहे, आणि हा विश्वासघात झाला आहे.
- अर्जुनच्या कुटुंबाने लाखो रुपये लग्नासाठी खर्च केला, जो चुकीच्या माहितीच्या आधारावर केला गेला. त्यांची फसवणूक आणि नुकसान याचे मूल्य लावणे अशक्य आहे.
सदर बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना देखील कळून चुकले की आता हा विवाह टिकणे शक्य नाही. म्हणून खालील अटीवर सामंजस्यपणे घटस्पोट (Divorce in Mutual Consent) घेण्याचे ठरले.
- सामंजस्याने घटस्फोट घेणे आणि होणारा सर्व खर्च रिया आणि त्यांच्या कुटुंबीयांनी करणे.
- रियाच्या कुटुंबाला अर्जुन याच्या कुटुंबाने केलेल्या लग्नाचा खर्च व्याजा सकट परत करणे.
निष्कर्ष
ही घटना समाजाला एक मोठा
धडा देतो की विवाहामध्ये पारदर्शकता असणे अनिवार्य आहे. वैवाहिक जीवन हा विश्वास
आणि स्पष्टतेवर आधारलेला असतो. जर कोणी महत्त्वाची माहिती लपवली तर त्याचे गंभीर
कायदेशीर परिणाम भोगावे लागतात.
या केसने दाखवले की
फसवणुकीच्या आधारावर उभारलेले नाते कधीच टिकू शकत नाही आणि कायदा अशा अन्यायाला
न्याय देतो.
High Court, Bombay,
.jpg)
Comments
Post a Comment